संजय बाबा कोकाटेंसह भारत शिंदेंचा अभिजीत पाटलांना पाठिंबा


माढा -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) २४५ माढा विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होत असून या मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. मिनलताई साठे, अपक्ष उमेदवार रणजित शिंदे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील उभे आहेत. या मतदार संघात गटा तटाच्या राजकारणाने वेगळीच रंगत आणली असून रोज मोठया घडामोडी घडत आहेत.

संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून, या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.

माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा

सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा मतदारसंघ राहिला आहे. लोकसभेला शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आता विधानसभेसाठी या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या मोठी होती. विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत महाविकास आघाडीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यंदा ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसून त्यांच्या सुपुत्रासाठी म्हणजे रणजित शिंदे यांच्यासाठी ते धावपळ करताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगलं यश

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. सध्या तेथून ते विद्यमान खासदार आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील 1, 20, 837 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »