भाजपने घेतला राहुल गांधींचा धसका; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली असून येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
अशातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून फेक नरेटीव्ह पसरवण्याचे काम करण्यात आले होते, असा आरोप भाजपने केला होता. ‘भाजप संविधान बदलणार’ या नरेटीव्हमुळे भाजप लोकसभेच्यावेळी चांगलाच कोंडीत सापडला होता. त्यामुळे यावेळी भाजपने याचा चांगलाच धस्का घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नागपुरातील प्रचारसभेदरम्यान संविधानाबाबत केलेल्या आरोपांवरून भाजपने राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक रॅलीमध्ये राहुल गांधी भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. राहुल गांधी पुन्हा, ‘भाजप संविधान बदलणार’ असल्याचे सांगत भाजपवर हल्लाबोल करत आहेत. हे वक्तव्य पूर्णपणे निराधार आहे, असेही भाजपचे म्हणणे आहे.
भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली
केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 6 नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर रोजी नागपुरात निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा एकदा खोटे बोलले. त्यांनी खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत भाजप संविधान नष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यांचे हे विधान अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.
भापचे नेते म्हणाले की, राहुल गांधींनी राज्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला. भाजप राज्यघटना नष्ट करणार असल्याची बाब खोटी आहे. हे थांबवावे, असे आम्ही आयोगाला सांगितले आहे. राहुल गांधींना हे करण्याची सवय आहे आणि इशारे आणि नोटीस देऊनही ते तसे करण्यापासून परावृत्त होत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत ‘एफआयआर’ नोंदवण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 6 नोव्हेंबर रोजी नागपुरात म्हटले होते की, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपचे लोक संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते केवळ पुस्तकावर हल्ला करत नाहीत तर ते भारताच्या आवाजावर हल्ला करत आहेत. आपल्या संस्था संविधानाने निर्माण केल्या आहेत. संविधान नसेल तर निवडणूक आयोग नसेल. ‘आरएसएस’ थेट हल्ला करू शकत नाही. त्यांनी पुढे येऊन विरोधात लढा दिल्यास त्यांचा १५ मिनिटांत पराभव होईल. ते ‘विकास’, ‘प्रगती’ आणि ‘अर्थव्यवस्था’ या शब्दांच्या मागे लपून हल्ला करायला येतात.