कोरेगावमधील १८ व्हीव्हीपॅटची होणार तपासणी; राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंनी भरले ८.५ लाख


कराड- प्रतिनिधी/जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क- राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम- व्हीव्हीपॅटबद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आलेली तक्रार, या सर्व पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान विधानपरिषद आ.शशिकांत शिंदे यांनी ईव्हीएम- व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची संख्या व त्यावरील मत तपासणीची मागणी केली आहे. त्यासाठीचे ८ लाख ४९ हजार ६०० रुपये शुल्कही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी जमा केले आहेत. ही मतदान यंत्रे सध्या साताऱ्यात असून बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) या कंपनीचे अभियंत्यांकडून ती तपासली जाणार आहेत.

 

ईव्हीएममधील मतांची व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची संख्या याची जुळणी न झाल्यास किंवा मतांच्या प्रमाणात शंका निर्माण झाली तर पुनर्गणना केली जाऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये इच्छुक पक्ष किंवा ही पुनर्गणना करू शकतात. त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वापरलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सच्या तपासणीची मागणी अर्जाद्वारे केली आहे. 

Advertisement

 

मतदारांमध्ये उत्सुकता

 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुती-शिवसेनाचे (शिंदे गट) उमेदवार आ. महेश शिंदे आणि मविआचे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या निवडणुकीत आ. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते, तर आ. शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यांनी पुन्हा मतदान यंत्रे तपासणी मागणी केल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

प्रिंट आऊट तपासण्याची व्यवस्था

 

मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट या मशीनवर एक पेपर स्लिप देऊन उमेदवाराला दिलेल्या मताची पुष्टी केली जाते. मतदानानंतर या पेपर स्लिपला ईव्हीएम यंत्राने मुद्रित केले जाते आणि ते एका यांत्रिक युनिटमध्ये सुरक्षित ठेवले जाते. निवडणूक आयोगाने मतदारांनी मतदान केल्यानंतर त्याचा प्रिंट आऊट तपासण्याची व्यवस्था केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »