“४०० उंबऱ्यांच्या गावात ३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का?”, मारकडवाडीतील मतदानावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल


अकलूज- प्रतिनिधी/जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क- विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला बहुमत मिळाले तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. यादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावच्या ग्रामस्थांनी देखील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी आज (३ डिंसेंबर) पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर गावकऱ्यांनी हा मतदानाचा निर्णय मागे घेतला. पण एकवेळी गावकऱ्यांनी काहीही झालं तरी मतपत्रिकेवर मतदान घेणार अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

Advertisement

मारकडवाडीतील गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका ही फक्त सुरूवात असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘मारकडवाडीत पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून सरकारने चाचणी मतदान थांबवलं असलं तरी यातच गावकऱ्यांचा विजय आहे. दडपशाहीने हा लढा संपलेला नाही तर आमदार जानकर साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आतातर फक्त वात पेटलीय आणि पुढील काळात सगळीकडे जनतेकडूनच ईव्हीएमचा पर्दाफाश केला जाईल’, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

छोट्याशा गावात ३०० पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आल्यावरून आमदार रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आज ३५०-४०० उंबऱ्यांच्या मारकडवाडीत सरकारने SRPF च्या तुकड्यांसह २५०-३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का? चाचणी मतदान रोखण्याची गरज होती का? सत्य समोर येण्याची भीती सरकारला होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं सरकार आणि आयोगाला द्यावी लागणार’, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

नेमकं झालं काय होतं?

विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी या गावातून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यामुळेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र आज मतदानाबाबतची प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्रशासनाने यासाठी विरोध केला. तसेच एक जरी मतदान टाकले गेले तर आम्ही मतपेट्या जप्त करू, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »