EVM विरोधी आंदोलनाची धग वाढणार, मारकडवाडीतून राहुल गांधींचा लाँग मार्च
पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर शंका उपस्थित केली. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीतील पक्षांकडून आंदोलनाची रुपरेषा आखली जात आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाची देशभरात चर्चा झाली. आता, याच गावात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी येणार असल्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली. ईव्हीएम विरोधातील लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मारकडवाडी आलं होतं चर्चेत…
राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्याशिवाय, देशभरातूनही ईव्हीएमविरोध संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. माळशिरसमधील ग्रामस्थांनी ईव्हीएम मतांवर अविश्वास दाखवला. निवडणूक निकालात विद्यमान आमदार उत्तम जानकर यांना फारच कमी मते असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी वाढला. अखेर ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची घोषणा केली. मात्र. प्रशासनाने या ग्रामस्थांना अटकाव करत अभिरुप मतदानाला विरोध केला. त्यानंतर ग्रामस्थांनी मतदानाची प्रक्रिया मागे घेण्याचा निर्णय घेतला. मारकडमधील गावकऱ्यांच्या या अभिनव आंदोलनाची देशपातळीवर चर्चा झाली.
राहुल गांधी मारकडवाडीत येणार
ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएमवर आंदोलन उभारण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. आता, ईव्हीएमविरोधातील लाँग मार्च हा मारकडवाडीतून काढण्यात येणार आहे. या लाँग मार्चची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली. सोलापुरात महाविकास आघाडीकडून प्रतिकात्मक EVM मशीन फोडून आंदोलन करण्यात आले. सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार हे आंदोलन झाले.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून लाँग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी येथी पडलेली ईव्हीएम विरोधातील ठिणगी देशभर वणवा पेटवणार असल्याचे जानकर यांनी म्हटले.