राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेलाः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वपूर्ण माहिती; शरद पवारांशी ‘इन जनरल’ चर्चा झाल्याचा दावा
नवी दिल्ली-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या शनिवारी म्हणजे 14 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली. राज्यात सध्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याविषयी उत्सुकता आहे. बहुतेक 14 तारखेला हा शपथविधी होईल, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर या नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी आपण पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाले अजित पवार?
आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वजण शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्हीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. आम्ही शरद पवारांसोबत अनेक विविध विषयांवर चर्चा केली. इथे काय सुरु आहे, तिथे काय सुरु आहे, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. परभणीला काय घडलं यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली. चहा पाणी नाश्ता झाला, आता निघालो, असे अजित पवारांनी म्हटले.
मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा?
यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी केव्हा होणार? असा प्रश्न केला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात सध्या मुख्यमंत्री व आम्ही दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच इतर मंत्र्यांचा शपथविधी केव्हा होणार? याविषयीची उत्सुकता आहे. आता 16 तारखेला राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. तेव्हा कामकाज करण्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता असते. त्यामुळे बहुतेक येत्या 14 तारखेला हा शपथविधी होईल.
कुणाचे किती मंत्री घेणार शपथ ?
दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे 20, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 13, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याची अद्याप पुष्टी झाली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवे असल्यामुळे प्रथम राज्य सरकार व आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची चर्चा आहे.