अमित शाह पवारांच्या भेटीला; ठाकरेंचा फडणवीसांना फोन, महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?
नवी दिल्ली-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राज्यात एकीकडे ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा रंगत आहे, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत गोठवणाऱ्या थंडीत राजकीय गाठीभेटींमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय. दिल्लीतून सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे अमित शाह यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाली आहे.
तर बुधवारी रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शाहांची भेट घेतली होती. बुधवारी रात्री अमित शाहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात खलबतं झाली. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बी.एल संतोष आणि शिव प्रकाश यांनीही त्या बैठकीला हजेरी लावली होती. अजित पवारांनीही अमित शाहांची भेट घेत महत्त्वाची चर्चा केली.
ठाकरेंचे खासदार मोदींना भेटणार
तर इकडं उद्धव ठाकरेंचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या तीन वेगवेगळ्या घडमोडी पाहाता भाजपकडून शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना गळाला लागवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून घडलेल्या घडामोडी वेगवेगळ्या असल्या तरी त्या भविष्यातील एका राजकीय भूकंपाची नांदी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंचा फडणवीसांना फोन
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. शपथविधी सोहळ्याला गैरहजर असले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून शुभेच्छा दिल्याचं फडणवीसांनी माध्यमांना सांगितलंय. त्यामुळे गेल्या 15 दिवसांमध्ये फडणवीस-ठाकरेंमध्ये तब्बल 2 वेळा बातचीत झाल्याचं समोर आलंय.
शरद पवार-अजित पवार भेट
दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार भेटले होते.