चार लाख हेक्टरवर पेरणी; जानेवारीत उजनीचे पाणी, धरणात ११९ टीएमसी साठा


टेंभुर्णी-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) जिल्ह्यात रब्बीचे चार लाख ६० हजार ९१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सध्या चार लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १५ जानेवारीपूर्वी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: ४० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून धरणात सध्या १०४ टक्के पाणीसाठा आहे.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. पण आता केवळ जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांची नाममात्र मंजुरी आवश्यक आहे.

मंत्र्यांचे खातेवाटप व पालकमंत्री निश्चित झाल्यावर कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यावेळी शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याच्या नियोजनाला मंजुरी घेतली जाणार आहे.

सध्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या दोन लाख ३९ हजार हेक्टरवर ज्वारी, सव्वालाख हेक्टरवर गहू व मका, उन्हाळी कांदा अशा पिकांची पेरणी झाली आहे. ऑक्टोबरपासून पेरणी झाली असून आता पिके तहानली आहेत.

Advertisement

आता १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत पहिले आवर्तन आणि एप्रिल ते मेअखेर या काळात दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा उजनी १०० टक्क्यांवर भरल्याने शेतीसाठी गरजेवेळी पाणी मिळणार असल्याने शेतकरी आनंदी आहे.

सोलापूर शहरासाठी सुटणार पाणी २५ डिसेंबरपासून भीमा नदीत पाणी

सोलापूर महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत शहरासाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली आहे. ४ जानेवारीपर्यंत औजमध्ये पाणी पोचेल, यादृष्टीने नियोजन करुन पाणी सोडावे, असेही त्या पत्रात म्हटले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा असल्याने शहरासाठी पाण्याची आवश्यकता असून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला उजनीतून २५ डिसेंबरला भीमा नदीद्वारे पाणी सोडावे लागणार आहे.

उजनीतील सध्याचा पाणीसाठा

एकूण पाणीसाठा

११९.३८ टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा

५५.७२ टीएमसी

पाण्याची टक्केवारी

१०४. टक्के

सोलापूरसाठी सोडावे लागणारे पाणी

५ टीएमसी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »