पुण्यात शरद पवार गटाचे मूक आंदोलनः देवेंद्र फडणवीस, अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा; प्रशांत जगताप यांची मागणी


पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पार्टीची मनमानी सत्ता असल्याने सर्वत्र अनागोंदी माजली आहे. परभणीत पवित्र संविधानाची झालेली विटंबना, त्यानंतर आंबेडकरी जनतेवर झालेले अत्याचार, आंबेडकरी चळवळचे कार्यकर्ते शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची लाठीमार करून करण्यात आलेली हत्या, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निघृण हत्या, भाजपचे नेते अमित शहा यांनी संसदेत केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या सर्व बाबी अत्यंत संतापजनक आहे.

जनसामान्यांचा हा संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाचे फलक दाखवून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले.

Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यांच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या गुंडांनी एका सरपंचाची निघृण हत्या केली आणि सरकार मात्र गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. परभणीत झालेला संविधानाचा अपमान व देशाच्या संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत मग्रुरीने केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अत्यंत संतापजनक आहे. देवेंद्र फडणवीस व अमित शहा दोघांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली.

काँग्रेसचे देखील आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय समोर काँग्रेसने देखील परभणी घटना व गृहमंत्री अमित शाह यांच्या आक्षेपार्ह विधान विरोधात तीव्र आंदोलन केले. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने पोलिस कोठडीत त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. याला गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी केलेला खून असून त्याबाबत दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. परभणीत दंगल घडते व कायद्याचा अभ्यास करणारा कार्यकर्ता खून होतो व चार दिवसांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करतात. त्यांना आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन वाटेत असेल, पण आमच्यासाठी ते न्यायदेवता आहे. गृहमंत्री यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »