गुजरातला पळाले, मंदिरात झोपले, पैसे संपले, सुदर्शन घुले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
बीड -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी कल्याण परिसरातून सिद्धार्थ सोनवणे यालाही अटक केली आहे. देशमुख यांची हत्या केल्यानंतर हे तिघेही पळून गेले होते. अखेर हत्येच्या 26 दिवसानंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आला आहे. 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपासात झाली आहे..
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्यांचं फारसं गांभीर्य नव्हतं. मात्र त्यांनी यूट्यूबवर बातमी बघितली. त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच, सर्व आरोपी फरार झाले. मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले. तेथे 3 तारखे पर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला होता. परंतु पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना शनिवारी केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणलं. येथे एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाची सुत्र हाती घेतली. त्यांनीही आरोपींवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
खरं तर, संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही एकत्रच रेल्वेनं पळाले होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तिघेही तेथील एका शिवमंदिरात थांबले होते. जवळपास १५ दिवस ते तिथेच राहिले. मंदिरातच जेवण करणं आणि तिथेच झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती. पण तीन दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता. पण त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले. इथे ते एका व्यक्तीला भेटणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. पण कृष्णा आंधळे आधीच पुण्यात आले, तिघांची चुकामूक झाली आणि तो फरार होण्यात यशस्वी ठरला.