नूतन आमदारांना प्रत्येकी १.८० कोटींची कामे सुचविण्यास मंजुरी; जिल्हा नियोजन समितीला सरकारकडून आमदार निधीऐवजी कामे मंजूर करण्याचे पत्र
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) नव्याने निवडून आलेल्या आमदारांना त्यांच्या आमदार निधीतून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात प्रत्येकी एक कोटी ८० लाख रुपयांची विकासकामे मंजूर करून घेता येणार आहेत. सरकारकडून जिल्हा नियोजन समित्यांना तसे पत्र पाठविण्यात आले असून मंजूर कामांचा निधी कामे सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून तत्कालीन आमदारांना प्रत्येकी तीन कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यावेळी त्या आमदारांना त्यांना मिळणाऱ्या निधीएवढी कामे मंजूर करून घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. आता नव्याने निवडून आलेल्या आमदारांना २०२४-२५ या आर्थिक वर्षातील चार महिन्यांसाठी आमदारनिधी द्यावा लागणार आहे, पण तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने निधीऐवजी शासनाकडून जिल्हा नियोजन समित्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक आमदारांना या आर्थिक वर्षातील त्यांच्या एक कोटी ८० लाख रुपयांच्या आमदार निधीतून कामे मंजूर करून घेता येतील, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील कामे सुचविण्यासंदर्भातील पत्रे पाठविली जात आहेत.
जिल्हा नियोजन समित्यांनाही ४० टक्केच निधी
सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मंजूर विकास आराखडा ७०२ कोटी रुपयांचा आहे. पण, आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीला त्यातील केवळ २८० कोटी (४० टक्के) रुपयेच मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर आराखड्यातील सर्वच कामांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. पण, अजूनही ‘डीपीसी’ला ६० टक्के निधी मिळालेला नाही. तिजोरीत पैसा नसल्याने राज्यातील बहुतेक जिल्हा नियोजन समित्यांची स्थिती अशीच असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
नूतन आमदारांना आमदारनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या आमदारांना प्रत्येकी १.८० कोटी रुपयांची कामे मंजूर करावीत, असे शासनाचे पत्र सोमवारी प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता कार्यवाही सुरू होईल. जिल्हा नियोजन समितीलाही उर्वरित निधी लवकरच मिळेल.
– दिलीप पवार, जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर
जिल्ह्यातील आमदारांना निधी
• एकूण आमदार
• ११
• चालू वर्षाचे शिल्लक महिने
• ३
• प्रत्येकी आमदार निधी
• १.८० कोटी
• सर्वांचा एकूण आमदार निधी
• १९.८० कोटी