राळेरास येथे वाघाचा वासरावर हल्ला: वैराग परिसरात वावर; भीतीचे वातावरण
वैराग -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) बार्शी तालुक्यात ठाण मांडून बसलेला वाघ वैराग भागात जनावरांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपळे दुमाला व मुंगशी आर (ता. बार्शी) परिसरात सोमवारी रात्री उशिरा वाघाने दोन वासरावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर पाठोपाठ लगेच मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास राळेरास (ता. बार्शी) येथील शेतकरी अरुण नामदेव जाधव यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.
बुधवारी सकाळी जाधव हे आपल्या शेतात गेल्यावर त्यांना वासरू जागेवर दिसून आले नाही. त्यावर त्याचा शोध घेतला असता ते काही अंतरावर मृतावस्थेत पडलेले दिसले. अरुण जाधव यांनी वन विभागाशी संपर्क केला असता वनपाल धनंजय शिरोडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
सदरचा हल्ला वाघानेच केल्याचे स्पष्ट केले. तसेच सासुरे येथील रामेश्वर आवारे या शेतकऱ्याचे देखील रेडकू गायब झाल्याचे वनपालांनी संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. वन खात्याच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वाघाचा मोहोळ तालुक्याच्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई
राळेरास येथील घटना शेतकऱ्याने वनविभागाला सकाळी सात वाजता कळविली. पण वनविभागाचे अधिकारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. गाडी नादुरुस्तीचे कारण त्यांच्याकडून देण्यात आले.