टिपेश्वरच्या बछड्याची बार्शीत दहशत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण!
बार्शी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) टिपेश्वर अभयारण्यातील टी-२२ या वाघिणीचा बछडा स्वत:ची हद्द निश्चित करण्यासाठी मे २०२३ मध्ये अभयारण्यातून बाहेर पडला. १९ डिसेंबर २०२४ रोजी येडशी अभयारण्यातील कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैद झाला. मागील २३ दिवसांत त्याने बार्शी आणि धाराशिवमधील सुमारे १५ ते २० जनावरांवर हल्ले केले आहेत. मात्र, मानवी वस्तीपासून तो दूर असून फक्त एकदाच पाच सेंकदासाठी तो कारी येथे मानवी दृष्टीस पडला आहे. मात्र, त्याचा दरारा बार्शी व धाराशिव जिल्ह्यातील बालाघाट क्षेत्रात कायम आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील पंधरा वर्षात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनानांतर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. वाढत्या ऊस क्षेत्रामुळे अनेक बिबटे सोलापूर जिल्ह्यातच जन्मले आणि वाढले आहेत. मात्र, सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यात मागील पन्नास वर्षांत कुठेही वाघ दिसल्याची नोंद नाही. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मे २०२३ मध्ये एक बछडा बेपत्ता झाला. २०२२ मध्ये टी-२२ हा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीचा हा बछडा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून बेपत्ता झालेला बछडा नांदेड जिल्ह्यातील काही गायींवरील हल्ल्यामुळे या परिसरात वावरत असल्याचा वन्यजीवप्रेमी व वनधिकाऱ्यांचा अंदाज होता. त्यांनतर तो तेथूनही गायब झाला.
सुमारे पाचशे किलोमीटरचे अंतर पार करत येडशी (जि. धाराशिव) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात तो १९ डिसेंबरला कैद झाला. त्यापूर्वी तो कधी तिथे पोचला याची निश्चित माहिती नसली तरी कॅमेऱ्यात कैद होण्यापूर्वी २० दिवस ते एक महिना आलेला असावा, असा तेथील वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. टिपेश्वरपासून येडशी अभयारण्य गाठेपर्यंत तो ना कुणाच्या दृष्टीस पडला ना कुठे कॅमेऱ्यात कैद झाला.
क्षेत्रनिश्चितीसाठी फिरणारा प्रौगंडवस्थेतील बछडा
बार्शी तालुक्यात फिरणारा वाघ पूर्ण वाढ झालेला वाघ नसून, प्रौगंडवस्थेतील बछडा आहे. २०२२ मध्ये तो जन्मलेला असून, सध्या त्याचे वय अडीच वर्षांहून अधिक व तीन वर्षांपेक्षा कमी आहे. एका प्रौढ वाघाचा व्यवस्थित अधिवास तयार होण्यासाठी किमान दहा हजार एकर जंगल आवश्यक आहे. मात्र, बार्शी तालुक्यालगत असलेले येडशी अभयारण्य हे २२३७.५ हेक्टर अर्थात पाच हजार ५९३.७५ एकर आहे. या अभयारण्यालाच्या अगदी लगत बार्शी वन विभागाचे काही क्षेत्र आहे. मात्र, वाघाचे अस्तित्व कामय राहील इतके पुरेशे क्षेत्र आणि वन्यप्राण्यांचे प्रमाण कमी आहे. पुरेशा शिकारी न मिळाल्यामुळे या वाघाचा येथे अधिवास निश्चित होणे कठीण आहे.
बिबटे आणि वाघ दोघांचाही वावर
जिल्ह्यात मोठ्या संख्येने रानडुकरे आहेत. ही रानडुकरे शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. याबरोबरच हरिण, काळवीट व अलीकडे नीलगायी यांचेही अस्तित्व आहे. रानडुक्कर, हरिण व काळविटांकडून पिकांचे मोठे नुकसान मागील अनेक दिवसांपासून होत आहे. यावर गुजराण करणारे वाघ व बिबटे हे दोन प्राणी आहेत.
वाढत्या उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. अशातच आता वाघाची भर पडली आहे. वाघ व बिबट्यांच्या वावरामुळे उपद्रवी रानडुकरे, नीलगायी व हरणांच्या संख्येला आळा बसू शकतो. ढेंबरेवाडी येथे वाघासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याही आढळलेला आहे. सध्या जिल्ह्यात एकाचवेळी वाघ आणि बिबट्याचा वावर आहे.
असा लागला वाघाचा तपास
धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब, वाशी या तालुक्यात नोव्हेंबर व डिसेंबर पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढले. नुकसान भरपाईसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्यात हल्ला करणाऱ्या वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे हे बिबट्याच्या पायांच्या ठशापेक्षा मोठे वाटल्यामुळे धाराशिवचे उपवनसंरक्षक किशोर पौळ यांना संशय आला. त्यांनी येडशी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांना अभयारण्यातील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावेत, अशी सूचना केली.
येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच या वाघाचे छायाचित्र कैद झाले. यामुळे या परिसरात वाघाचा वावर सुरू झाल्याचे समजले. तेव्हापासून धाराशिव वनविभाग, येडशी अभयारण्य वन्यजीव विभाग व सोलापूर वनविभाग संयुक्तपणे वाघाच्या पाळतीवर आहेत.
२३ दिवसांत धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात या वाघाचा वावर कायम आहे. वाघ कॅमेऱ्यात जरी १९ डिसेंबरला कैद झाला असला तरी त्यापूर्वी २० दिवस ते एक महिना येडशी परिसरात वावरत असावा, असा अंदाज येडशी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
परतण्याची शक्यता कमीच
टिपेश्वर अभयारण्यात २०२२ मध्ये जन्मलेल्या या वाघाचे सध्याचे वय अडीच वर्षाहून अधिक व तीन वर्षापेक्षा कमी आहे. यापैकी पंधरा ते १८ महिन्याचा होईपर्यंत तो आईसोबत टिपेश्वर अभयारण्यात वावरला आहे. त्यावेळी या अभयारण्यातील कॅमेऱ्यात तो दिसलेला आहे. मे २०२३ ते जानेवारी २०२५ हे सुमारे १९ महिने तो हद्द निश्चित करण्यासाठी संघर्ष करत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाढत्या वाघांची संख्या पाहता तो परत माघारी जाणे कठीण आहे.
यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातून मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात आलेला वाघ चार वर्षांपासून गौताळा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथेच ठाण मांडून आहे. यामुळे हा वाघ देखील स्वत:हून परत जाण्याची शक्यता कमी आहे. कळंब येथील बावी गावाजवळ सोलापूर-धुळे हा सहापदरी महामार्ग ओलांडून परत गेलेला हा वाघ पुन्हा माघारी आलेला आहे. यावरून त्याला परत टिपेश्वरकडे जाण्यात रस आहे, असे वाटत नाही.
भोगावतीच्या खोऱ्यात वावर
या वाघाचा आतापर्यंतचा सुमारे महिनाभरातील वावर पाहता भोगावती नदीचे खोरे त्यांने सोडलेले नाही. त्यांने पहिल्या टप्प्यात येडशी अभयारण्य परिसरालगत असलेल्या भोगवातीची उपनदी असलेल्या राम नदी परिसरातील ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, पांगरी, पांढरी, कारी-नारी, उक्कडगाव, चारे परिसरात आपला मुक्का ठोकला होता.
त्यानंतर रामलिंग परिसरात उगम पावणाऱ्या भोगावती नदीच्या परिसरातील उपळे दुमाला, मुंगशी (आर), राळेरास परिसरातील हल्ल्यानंतर वैरागच्या पूर्व-उत्तर दिशेला असलेल्या लाडोळे परिसरात गुरुवारी हल्ला केलेला आहे. त्याने आतापर्यंत सोलापूर- धुळे हा महामार्ग दोन वेळा ओलांडला असून, बार्शी- लातूर, बार्शी-तुळजापूर, वैराग-तुळजापूर हे वर्दळीचे रस्ते व बार्शी- लातूर हा रेल्वे मार्गही सुरक्षितरित्या ओलांडला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांचा तपशील
ता. गाव शेतकरी पाळीव प्राणी
१६ डिसेंबर चारे पंढरीनाथ देशमुख २ गाय
१६ डिसेंबर उक्कडगाव सतीश सोनवणे १ कालवड
१७ डिसेंबर चारे रोहिणी कात्रे १ बोकड
१९ डिसेंबर ढेंबरेवाडी सोहम तापकिरे १ गाय
२२ डिसेंबर पांढरी सर्जेराव गवाले १ म्हैस (जखमी)
१ जानेवारी चारे प्रताप जगदाळे १ गाय
७ जानेवारी मुंगशी (आर) राहुल कुरुंद २ वासरे
८ जानेवारी राळेरास दशरथ जाधव १ वासरू
८ जानेवारी राळेरास वासुदेव आवारे १ रेडकू
९ जानेवारी वैराग (लाडोळे हद्द) विनायक खेंदाड १ बैल (जखमी)
१० जानेवारी लाडोळे संदीप सावंत १ गाय
स्थानिक म्हणतात…
येडशी परिसरात आलेला वाघ हा येथील शेतकरी व ग्रामस्थांसाठी संकट मानता कामा नये. या वाघामुळे स्थानिकांना व पर्यटन रोजगाराची संधी निर्माण करू शकतो. हा वाघ येडशी अभयारण्यातील पर्यावरण संरक्षक साखळीचा दुवा ठरेल. भविष्यात वाघ दर्शनाच्या सफरीसाठी येडशी व बार्शी परिसर प्रसिद्धीस पावेल.
– सुखदेव नारायणकर, माहिती सहायक, माहिती व जनसंपर्क विभाग व स्थानिक नागरिक (पांगरी ता. बार्शी)
– येडशी अभयारण्यात वाघाचा कायमस्वरूपी अधिवास राहिला तर ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह राहील. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या पशुधन मालकास वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी येथील वाघ किंवा बिबट्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे. याबाबत वनविभाग, लोकप्रतिनिधी व पर्यावरणप्रेमींनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
– विशाल गरड, व्याख्याते तथा स्थानिक नागरिक पांगरी (ता. बार्शी)
वन अधिकारी म्हणतात…
– बार्शी-येडशी परिसरात वाघाचा वावर सुरू होताच वाघ सनियत्रंण समितीने वाघाच्या स्थलांतराचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग नागपूर यांच्याकडे पाठविलेला आहे. यावर त्यांनी काही त्रुटी (क्युरी) काढलेल्या आहेत. त्याची देखील पूर्तता करण्यात आलेली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत त्यांचा पुढील आदेश येईल. त्याप्रमाणे सह्याद्री, टिपेश्वर किंवा पेणगंगा अभयारण्यात वाघाचे स्थलांतर केले जाऊ शकते.
– कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक, सोलापूर
– बार्शी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बाधित झालेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना भरपाई देण्यात येत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत झालेल्या सर्व हल्ला प्रकरणांचे तपशीलवार अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. १ जानेवारीपासून आजपर्यंतच्या सर्व प्रकरणांची अहवाल तयार करणे सुरू आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
– अलका करे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बार्शी
– बार्शी तालुक्यात फिरणाऱ्या वाघावर दोन्ही जिल्ह्यातील वनविभाग लक्ष ठेऊन आहे. हा वाघ पूर्ण वाढ झालेला व पूर्ण प्रशिक्षित देखील नाही. यामुळे याच्या हातून शिकार करताना मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. त्याने अनेक शिकारी केल्या असल्या तरी त्या मांस कमी प्रमाणात खाल्ले आहे. पूर्ण वाढ झालेला वाघ एका वेळी ३५ ते ४० किलो मांस खातो. चार-पाच दिवसाला एक शिकार केली तरी महिन्याला पाच सहा शिकारी पुरेशा ठरतात. मात्र या वाघाने जास्त हल्ले केले आहेत.
– अमोल मुंडे, वन परिक्षेत्र अधिकारी, येडशी अभयारण्य (जि. धाराशिव)
लोक प्रतिनिधी म्हणतात…
– वाघाने बार्शी तालुक्यातच ठाण मांडले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बद्दल सोलापूरचे उपनसंरक्षक यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या बरोबरही बोललो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांने माणसांवर हल्ले केलेले नसल्याने त्याला पकडता येत नाही. वन मंत्र्यांशी बोलणे झाले. त्यांना ई-मेलही केलेला आहे. किमान या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची व्यवस्था तरी करावी.
– दिलीप सोपल, आमदार, बार्शी
– वाघाने मागील महिन्याभरात धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यामुळे शेतकऱ्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा. वाघामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाणे कठीण झालेले आहे.
– ओम राजेनिबांळकर, खासदार, धाराशिव