पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडलीः राज्यात हे सर्वत्र सुरू, पंकजा मुंडेंचा दावा; सुरेश धसांमुळे बीड बदनाम होत असल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पुण्यात तरुणीला मारल्याची एक वाईट घटना घडली. सध्या राज्यात सगळीकडेच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे भांडण अथवा खून आदी घटनांवरून राजकारण करणाऱ्यांसाठी सध्या मोठी संधी आहे, असे मत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमधील संतोष देशमुख हत्याकांवर भाष्य करताना व्यक्त केले. सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना मकोका लावण्यात आल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे मी त्यावर काय प्रतिक्रिया देऊ? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आहे. तपासावर बोलणे योग्य ठरणार नाही. पुण्यात काल एक वाईट घटना घडली. एका तरुणीला ठार मारण्यात आले. हे सगळीकडेच घडत आहे. कोणतीही घटना घडते. भांडण अथवा खून याचे ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी काउंटर करणार नाही. शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही असे ते म्हणालेत. ते असे म्हणत असतील तर मी रोज काय बोलू? आमदार सुरेश धस यांच्यावर मी काय बोलू? मी कुठे गप्प आहे. मी स्वतः या प्रकरणी पहिल्यांदा एसआयटीची मागणी केली होती. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलत आहेत, ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षांत का बोलले नाही. त्यांच्यामुळे बीड बदनाम होत आहे. त्यांनी राजकीय भूमिका न घेता हा विषय संवेदनशीलपणे समजून घेतला असता तर बीडची अशी बदनामी झाली नसती.
अशा घटना सगळीकडेच घडत आहेत
आमच्या जिल्ह्यात स्वाभिमानी लोक आहेत. मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते. सर्वात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत. आम्ही काम करतो. आता सांगितली जात आहे तशी स्थिती असती तर आम्ही दरोडे टाकायला गेलो असतो ना? अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआयमधून माझ्याकडे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे. नागपूरची घटना काय, पुण्याची काय असे सगळीकडेच घडत आहे. विशेषतः मी पर्यावरण मंत्री आहे. त्यामुळे मी या विषयावर काय बोलणार. मुख्यमंत्री या प्रकरणी योग्य ती भूमिका मांडत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
नदी पुनर्जिवित करणे हे माझे उद्दीष्ट
पंकजा पुढे म्हणाल्या, मी माझ्या विभागाची बैठक घेत आहे. माझ्या खात्याला बळ देण्याचे काम करत आहे. मी उगीच आपल्या अधिकाऱ्यांना झापले वगैरे नाही. मी त्यांना समजून घेतले. माझे मागे अशीच गर्दी आहे. कमी जास्त असे काही झाले नाही. प्रदूषण हा विषय राज्यापुरता नाही तर जागतिक पातळीवरचा विषय आहे. मी देश व परदेश सगळीकडून मार्गदर्शन घेत आहे. प्रदुषणाबाबत आढावा घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल. मग महापालिका असो वा अजून काही… नदी पुनर्जिवित करणे हे आमचे मुख्य काम असेल.