रेल्वेने फक्त सव्वातीन तासांत सोलापूर ते पुणे: ताशी वेग ११० वरून १३०; ८८ एक्स्प्रेस गाड्यांना फायदा
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पुणे-सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगात होणार आहे. या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे. रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या सव्वातीन तासात पोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार आहे. जवळपास ८८ एक्स्प्रेस रेल्वेचा वेग आता ११० वरून १३० इतका झाला असल्याची माहिती आहे.
सोलापूर ते पुणे दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापुरातील अनेक तरुण पुण्याकडे रोजगारासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे भविष्यातही पुणे आणि सोलापूर या दोन शहराची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार आहे. सोलापूर शहरात आयटी उद्योग येणे प्रस्तावित आहेत. किंबहुना लवकरच त्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याने पुण्यावरून सोलापूरकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढणार असल्याने या दोन शहरासाठी विमानसेवाही सुरू व्हावी अशी इच्छा आहे.
पुणे-दौंड-सोलापूर सेक्शनवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ट्रॅक सुधारणा, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी सेक्शनवर (३४१.८० किमी) अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितासपर्यंत वाढला आहे.
या विभागांवर एकूण ४४ (अप-डाऊन-८८) रेल्वे सध्याच्या ११० किमी ताशीवरून १३० किमी ताशी वेगाने धावणार आहेत. त्यामुळे पुणे ते सोलापूर हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. एक्स्प्रेस, मेल आणि डेमो यांच्या वेगामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. सोलापूर- पुणे ये- जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुणे-सोलापूर यादरम्यान धावणाऱ्या उद्यान, हसन, कोइमतूर, कराईकल, कोणार्क, उद्यान, शताब्दी, सिद्धेश्वर, हुतात्मा, चेन्नई, काकीनाडा, बिकानेर, यशवंतपूर, इंटरसिटी, विशाखापट्टणम, नागरकोईल, काकीनाडा, के. के. यासह अन्य ४४ गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार आहेत.
रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढविणे शक्य झाले आहे. वेग वाढल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कमी वेळात गाड्या पोचण्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढू शकते.
– योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक