पंचासमक्ष मागितले 1 लाख आणि त्यातील 50 हजार घेताना अडकले ACB च्या जाळ्यात; कनिष्ठ अभियंतावर कारवाई
अकलूज – (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) दोन ग्रामपंचायतीमधील इलेक्ट्रिकलच्या कामाची बिले काढण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याने ६७ हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.पंचासमक्ष या कनिष्ठ अभियंत्याने भविष्यातही मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडले.
शशिकांत सयाजी चौगुले असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका पंचायत समितीत कार्यरत आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ३७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शासकीय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना आहे. त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केली आहे. या फर्मद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करण्यात येत असतात.
या फर्मला मिळणारी शासकीय इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या बिलासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तक्रारदाराला अधिकारपत्र दिलेले आहे. तक्रारदाराने फर्मच्या वतीने फळवणी ग्रामपंचायत येथील शासकीय इलेक्ट्रिक कामे पूर्ण केलेली आहे. त्याबाबतचे बिल त्यांना मिळाले आहे. तसेच त्यांनी पिलाव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोड लाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत होते. तक्रारदार हे कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले यांच्याकडे गेले असताना त्यांनी तक्रारदारांकडे फळवणी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३४ हजार रुपये व पिलाव ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी करत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३३ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीची पडताळणी १६ जानेवारी रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यात दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिकल कामाचे बील मंजुरीसाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तसेच तक्रारदाराने इतरत्र केलेल्या कामाचे बील भविष्यात मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माळशिरस तालुका पंचायत समितीत सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये स्वीकारताना शशिकांत चौगुले याला रंगेहाथ पकडण्यात आले. चौगुले याच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार तपास करत आहेत.