सोलापूर-पुणे महामार्ग आता सहापदरी होणार, ३ उड्डाणपूल; सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास करा सुसाट!


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पुणे राष्ट्रीय महामार्ग आता लवकरच सहापदरी होणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षानंतर हा महामार्ग सहापदरी होईल, असं एनएचआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत दररोज वाहनांची संख्या ४२ हजारांवर पोहोचली होती. वाहनांची वर्दळ वाढल्यानं अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे हा महामार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सोलापुरात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दररोज सरासरी २ जणांचा अपघाती मृत्यू होतोय. रस्ते अपघातासोबत मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वाधिक अपघात होणार्‍या ठिकाणी, शेती किंवा घराकडे ये जा करण्यासाठी स्थानिकांना विरूद्ध दिशेने प्रवास करावा लागतोय. अशा ठिकाणी उड्डाणपूल उभारले जात आहेत. जेणेकरून रहदारी करताना स्थानिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही.

Advertisement

मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ उड्डाणपूल उभारला आहे. तसेच अर्जुनसोंडजवळ उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल लांबोटी पुलापर्यंत असणार आहे. त्यासाठी साधारण १९ कोटी रूपयांचा खर्च केला जात असून, वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच अनगर पाटीजवळ उड्डाणपुलासाठी ४५ कोटी खर्च होणार आहे. याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

सावळेश्वरजवळील उड्डाणपुलासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मंजूरीनंतर या पुलाचे काम सुरू होईल अशी माहिती आहे. मुख्य म्हणजे सोलापूर – पुणे महामार्ग सहापदरी करताना फार भूसंपादनाची गरज भासणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालकाने सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर- पुणे महामार्गावरील अनगर आणि अर्जुनसोंड या दोन ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी आणि गावकऱ्यांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारले जाणार आहे. याचं एका वर्षात काम पूर्ण होईल. सोलापूर- पुणे महामार्ग सहापदरी व्हायला आणखीन काही वर्षे लागतील. वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »