विद्यार्थी बनले व्यापारी! श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये बाल आनंद बाजार उत्साहात साजरा
माढा -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) वडाचीवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालामध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत बाल आनंद बाजारचे आयोजन केले होते. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या शेतातून आणलेला विविध प्रकारचा भाजीपाला, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, राजगिरा, मेथी, गावरान भाज्या, देशी अंडी, वांगी, पेरू, कलिंगड, पपई, तसेच खाऊगल्ली मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस, शाबुवडा, कांदाभजी, पोहे, इडली, उडीद वडा, समोसे, वडापाव अशा चटकदार पदार्थांनी पालकवर्ग व ग्राहकांना आकर्षित केले.
या निमित्ताने गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व पालकांनी आर्वजून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व खाऊगल्लीचा आस्वाद घेतला. बाल आनंद बाजाराचे आयोजन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे या हेतूने ह्या उपक्रमाचे आयोजन केले होते. वडाचीवाडी गावचे माजी सरपंच शिवाजी काळे, शंकर डोंगरे, सरपंच रामेश्वर कोळी, संस्थापक अध्यक्ष दाजी कवले सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी विद्यालयातील या उपक्रमाचे कौतुक केले.