अजितदादांना पाया पडून सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे; धनंजय मुंडेंच खळबळजनक विधान
शिर्डी- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात मंत्री धनंजय मुंडे हेसुद्धा उपस्थित झाले आहेत. पहिल्या दिवशी प्रकृती बरी नसल्याने धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला येणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली होती. आज शिर्डीतील नवसंकल्प शिबिराज धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. कालच जाहीर झालेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीसह संतोष देशमुख हत्या प्रकरण ते पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक मुद्द्यावर धनंजय मुंडे या भाषणात बोलले. पहाटेच्या शपथविधीवेळी मी अजितदादांना तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे असं सांगत होतो असं धनंजय मुंडे म्हणाले.
नवसंकल्प शिबिरात धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये गेल्या महिन्याभरात घडत असलेल्या घडामोडींवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आलीय. बीडच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडलाय. आम्ही शिव शाहू फुलेंच्या विचाराचे आहोत का असा प्रश्न विचारला जातोय. पण एक सांगेन की आपला एकमेव पक्ष आहे जो शिव शाहू फुलेंच्या विचाराने चालतो.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना धनंजय मुंडेंनी म्हटलं की, सरपंच देशमुख यांच्या निर्घृण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही. हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवायला पाहिजे. ५-८ गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होतेय. बीडचा बिहार झालाय म्हणतायत, पण कुणी केला? १२ ज्योतिर्लिंगापैकी एक परळी आहे. पण एका गावाला आणि जिल्ह्याला बदनाम करण्यात येतंय असंही धनंजय मुंडे म्हणाले.
माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यासोबत राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील परतफेड करू शकणार नाही. गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेतलं. टीका करायची झाली तर माझ्यासारखा टीकाकार होणार नाही. नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यांवर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे असंही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
२०१९ मध्ये अजित पवार आणि देवंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. त्याबद्दलही धनंजय मुंडे बोलले. ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीवेळी मी अजितदादांना सांगितलेलं की तुम्ही भाजपसोबत नका जाऊ, हे षडयंत्र आहे. पायाही पडलो. तेव्हा दादा म्हणाले की, काही नाही होणार. सुनील तटकरे साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू झालं.