“सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत करेक्ट कार्यक्रम करू”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आज एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील काही अधिकारी काम करत नसल्याचा आरोप केला. तसेच काही अधिकारी लोकप्रतिनिधीची देखील दिशाभूल करतात. मात्र, आता अधिकाऱ्यांनी त्यांची जुनी सवय बदलावी, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे. अधिकारी जनतेचे सेवक आहेत, त्यांनी जनतेचं सेवक म्हणूनच काम केलं पाहिजे, असंही धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले?
“आपल्या तरुणांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. मघाशी भाषणात भारत आबा बोलले की अजून बऱ्याच अधिकाऱ्यांची जुनी सवयी जात नाहीये. आता या ठिकाण पत्रकार मंडळी आहेत, त्यांनी माझं वक्तव्य व्यवस्थित रेकॉर्ड करावं. जर अधिकारी लोकप्रतिनिधींना खोटं बोलत असतील, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील. आता सोशल मीडिया आणि चॅनेलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आमचा निरोप द्या. या ठिकाणी दोन आमदार आणि एक खासदार बसलेले आहेत. अधिकारी जनतेचे सेवक आहेत आणि जनतेची कामे केली पाहिजेत. आम्ही काय त्यांच्याकडे वैयक्तिक कंत्राट माघत नाहीत”, असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
“जर अधिकारी खोटी दिशाभूल करत असतील तर या दोन आमदारांकडे त्यांचं विधानसभेचं अस्त्र आहे, ते हक्कभंग आणू शकतात. तसेच मला लोकसभेचे अधिकार आहेत. मी जर लोकसभा सचिवालयाला पत्र दिलं तर अधिकाऱ्यांना दिल्लीला वर्षभर हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करू नये. ते जनतेचे सेवेक आहेत आणि जनतेचे सेवकच राहावेत. मात्र, जर अशा पद्धतीने वागले तर मोजून आठवड्याच्या आत त्यांना काम लावेन आणि करेक्ट कार्यक्रम करेन”, असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.