ड्रोनद्वारे वाघाची शोध मोहीम सुरू
माढा -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) गत दोन महिन्यापासून बार्शी तालुक्यात धुमाकूळ घालून अनेक पाळीव प्राण्याचा बळी घेणारा टिप्पेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ आज सहाव्या दिवशीही पथकाच्या हाती लागला नाही. दमछाक झालेल्या पथकाने आता ड्रोनद्वारे वाघाची शोध मोहीम सुरू केली आहे.
शनिवारी रात्री धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी शिवरात वाघाचे ठसे वनविभागाच्या कर्मचार्यांना आढळून आले. त्यामुळे वाघ हा बार्शी तालुक्यातून धाराशिव जिल्ह्यात गेला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उक्कडगाव येथील वडाची खोरी मधील जालदरा भागात वाघाने पशुपालकाच्या जनावरांच्या कळपात घुसून भर दिवसा चार पाळीव प्राण्यांचा बळी घेतला होता. त्या नंतर वाघाने त्याच रात्री शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास पुन्हा आगमन केले होते. मात्र तेव्हा पासून तो वाघ आढळून आला नाही. रविवारी दिवसभर कुठेही वाघाचे दर्शन झाले नाही अथवा उशिरापर्यंत कुठे पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याची वार्ताही नव्हती. मात्र वन विभागाच्या वतीने पांगरी परिसरातील उकडगाव, ढेंबरेवाडी, पांढरी येडशी आदी परिसरात ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. गत मंगळवार पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने पांगरी जवळील ढेंबरेवाडी येथून वाघाची शोध मोहीम सुरू केली आहे.
ड्रोनमध्येही दिसला नाही वाघ
आज मोहिमेच्या सहाव्या दिवशीही वन विभागाच्या अधिकार्यांसह पथक अभयारण्यामध्ये शोध मोहीम राबवताना दिसून येत होते. अनेक ठिकाणी ड्रोन फिरविण्यात आले. मात्र हाती काहीच लागले नाही.