सोलापुरातील भाजपचे पाचही आमदार ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडून आलेत; प्रणिती शिंदेंचा आरोप
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे पाचच्या पाचही आमदार ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडून येतात आणि आपण गप्प बसतो..? का स्वतःला त्रास करून घेताय..? असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. सोलापुरातील शास्त्रीनगर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी हा आरोप केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर सातत्याने आरोप केले आहेत. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी तर आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या आरोप महत्वपूर्ण मानले जात आहेत.
त्या म्हणाल्या, माझ्याच लोकांमध्ये मी पोलिस आणि बॉडीगार्ड आणले तर काय उपयोग आहे. माझ्या लोकांपासून मला काही भीती नाही, त्यामुळे मी वेगळी आहे आणि मी इथेच आहे. आणखी कुठेही नाही. मात्र, या मातृभूमीला तुमची गरज आहे, तिला एक ठेवा..
सोलापुरात आपण चार हुतात्मा दिन साजरा केला, ते चार हुतात्मा हे वेगवेगळ्या जातींचे आणि धर्माचे होते. पण त्यांनी या देशासाठी रक्त सांडलं. काश्मीरमध्ये जेव्हा जवान देशासाठी काम करतो आणि पाकिस्तानमधून त्याच्या छातीवर गोळ्या घातल्या जातात, तेव्हा तो एका धर्म आणि समाजाचं संरक्षण करत नाही तर संपूर्ण देशाचं संरक्षण करत असतो, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
शिंदे म्हणाल्या, जेव्हा आपण राजकारणात धर्म-जात-पात करतो, तेव्हा त्या शहीद जवानाचा अपमान होतो. मी मतं मागतानाही कधी हात जोडून विनंती केली नाही. मात्र, आत्ता मला तुमच्याशी बोलावं वाटतं आहे. प्लिज माझ्या देशाला आणि माझ्या मातृभूमीला वाचवा, हे तुमच्याच हातात आहे. कोणताही पंतप्रधान वाचवू शकत नाही, उलट तेच बिघडवतायत. म्हणून तुम्हारे हवाले वतन साथियों, आता सगळं तुमच्या हातात आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, महागाई, जीएसटी वाढलीय. सोलापुरात दररोज पाणी नाही, सात दिवसाआड घाण पाणी येतंय.. सोलापुरात अजूनही आयटी पार्क आलेलं नाही. विमान उडालेलं नाही, विडी कारखाने बंद होतायत आणि पगारीही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ह्यांना फक्त घोषणाबाजी सुचते, बाकी कोणी काही बोलत नाही..
भाजपच्या लोकांनी सोलापूर शहराला दोन दिवसाआड पाणी देण्याचं आश्वासन दिलं. पण, या विषयावर काँग्रेसशिवाय कोणीही बोलायला तयार नाही. भाजपची लोक फक्त भडकाऊ भाषण करतात. भाजप आणि एमआयएम दोन्हीही तेच करतात, असा दावाही खासदार शिंदे यांनी केला आहे.