सोलापूर जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री सुरू, पुरवठादार मोकाट!
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सोलापूर जिल्ह्यात तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. शहरासह गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू अन् गुटख्याची विक्री होत आहे. शाळा परिसरातील टपऱ्यांवरही खुलेआम सुरू आहेत. प्रशासनाच्या निशाण्यावर बंदी असलेली सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेते असले तरी पुरवठादार मात्र मोकाट असल्याचे दिसत आहे. धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न आहे.
राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला तेरा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे.
गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात गुटखा शेजारच्या राज्यांमधून येतो. महाराष्ट्रात गुटखा उत्पादन आणि सेवन यावर बंदी असली तरी, शेजारच्या राज्यांमध्ये बंदी नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात गुटखा सर्रासपणे मिळतो.
तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले; पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते.
गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटख्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत.
गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही. अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू, गुटख्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. तरीपण, गुटखा, मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
गुटखा येण्याची काही कारणे
शेजारच्या राज्यांमध्ये गुटखा बंदी नाही
गुटखा विक्री बंदी असूनही पानटपरी, दुकानांमध्ये गुटखा विक्री
आंतरराज्यीय सीमांवर तपासणी नाके असतानाही गुटखा येतो
गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा सुरू केलेला व्यवसाय
त्यामुळे गुटख्याची सर्रास विक्री
शहर जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखू आणि गुटखा तसेच या तंबाखूचा वापर करून करण्यात आलेला व्हावा अशी विक्री होत असेल त्यांनी आमच्या विभागाशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू.
– साहेबराव देसाई, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन