पैशासाठी खून करून मृतदेह शेतात पुरला; बार्शी ग्रामीण पोलिसांकडून खुनाचा उलगडा, दोघांना अटक
बार्शी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) बाभूळगाव (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायत हद्दीतील उसाच्या शेतात आढळलेल्या 68 वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींनी संगनमताने सोन्याची चेन आणि पैशासाठी खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी दिली. सुरेश रंगनाथ शिंदे (वय 68 रा. बाभुळगाव ता. बार्शी) असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर दिलीप निवृत्ती झोंबाडे, (रा. रा बाभुळगाव ता. बार्शी) व राहुल नागेश गायकवाड (रा. कडलास ता. सांगोला) असे खून करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मयत शिंदे यांचा मुलगा गोविंदा सुरेश शिंदे यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश शिंदे हे सोमवारी ता.17 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बार्शी येथून बाभूळगावला निघाले होते. बार्शीवरून आगळगावपर्यंत गेले. परंतु, ते बाभूळगाव येथे घरी गेले नाहीत. त्याबाबत मुलगा गोविंदा शिंदे यांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्याकडे चौकशी केली. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत.
गुरुवारी (ता. 20) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या शेतात ऊस लागवड सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये एक मानवी पाय उघडा व बाकीचे शरीर मातीत अर्धवट पुरलेले दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी दोन पंचासमक्ष सदरचा मृतदेह उकरला असता तो सुरेश शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी शिंदे यांचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले व गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसून आल्या. यावरून अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून सुरेश शिंदे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना पुरले आहे म्हणून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान वेगवेगळ्या पथकांनी परिसरात सखोल चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी दिलीप झोंबाडे व सालगडी राहुल गायकवाड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व पैशांसाठी कट रचून खून केला आणि नितीन शिंदे यांच्या शेतात त्यांचा मृतदेह पूरल्याची कबुली दिली. दोघांनाही बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे, अभय उंदरे, धनराज केकाण, पोलीस नाईक सागर शेंडगे, राहुल बोंदर, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तर पथकाला बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक उपनिरीक्षक अजित वरपे, हवालदार धनराज फत्तेपुरे, रतन जाधव यांनी केली. तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचाही तपासात मोलाचा वाटा होता.

