सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींच्या निर्दयी कृत्यावर संतापाचा लाट ! मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ आले समोर
बीड -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपींनी दाखवलेल्या क्रौर्याने माणुसकीला काळीमा फासला आहे. या हत्येची चौकशी करताना पोलिसांना मिळालेल्या १५ हृदयद्रावक फोटो आणि व्हिडीओंनी संपूर्ण तपास यंत्रणा हादरून गेली आहे.
या चार्जशीटमध्ये समाविष्ट केलेल्या फोटोंमध्ये आरोपींनी संतोष देशमुख यांना दिलेल्या अमानुष छळाचे पुरावे स्पष्टपणे दिसून येतात. पोलिसांच्या मते, हा पूर्वनियोजित कट होता, ज्यासाठी आरोपींनी काटेकोर योजना आखली होती.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख हे गावाच्या विकासासाठी सतत झटणारे नेतृत्व होते, त्यामुळे त्यांची अशी क्रूर हत्या झाल्याचे गावकरी अजूनही स्वीकारू शकत नाहीत. तमाम नागरिकांनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे.
न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब आणि गावकरी
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन व्हावे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील तपासात नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.