करमाळ्यात सहकारी संस्थेचा पहिला सौर उर्जा प्रकल्प; गोकुळ दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी


करमाळा- प्रतिनिधी/जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क: देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सोलापूरच्या करमाळा तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. साडेसहा मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याकडे मागील काही दिवसांपासून भर दिला जात आहे. घरांच्या छतांवर सौर प्रकल्प उभारणी मोठ्या प्रमाणात होत असताना काही कंपन्या देखील प्रकल्प उभारणी करत आहेत. तर आता सहकारी संस्था देखील यात उतरली असून देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प करमाळ्यात उभारण्यात आला आहे. गोकुळ दुध संघाचा वीजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

दूध संघाची महिन्याला ५० लाखांची वीज बचत

Advertisement

सदरच्या प्रकल्पासाठी ३३ कोटी ३३ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दैनंदिन साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या वीज निर्मितीमधून गोकुळ दूध संघाची दर महिन्याकाठी सुमारे ५० लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे. हा सौर ऊर्जेचा प्रकल्प करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी गावमध्ये १८ एकर माळरान जमिनीवर पुणे येथील एका खाजगी कंपनीच्या सहकार्यातून उभा केला आहे. येथे तयार झालेली वीज महावितरण कंपनीला देण्यात आली आहे.

१८ किमीपर्यंत वीज जोडणी

यासाठी सुमारे १८ किलोमीटर पर्यंतची वीज जोडणी स्वत: दूध संघाने केले आहे. या प्रकल्पासाठी गोकुळ दूध संघाने मोठी गुंतवणूक केली असून पाच वर्षांनंतर हा प्रकल्प कर्जमुक्त होणार आहे. या प्रकल्पाचे उदघाटन आज करण्यात आले. आगामी काळात सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणार आहे. अनेक वाहने सौरऊर्जेवर चालतील अशी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल, डिझेल इंधनावरील ताण कमी होईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »