सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्टः भाजप आणि काँग्रेसची युती, आमदार कल्याणशेट्टींच्या नेतृत्वाखाली एकत्रित पॅनल


सोलापूर- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आले. या पॅनलला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप आणि काँग्रेस युतीमुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचे म्हटले जात आहे. मागील निवडणुकीच्या वेळेसही काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला पाठिंबा दिला होता. तर आमदार सुभाष देशमुख यांनी विरोधी पॅनलकडून निवडणूक लढवली होती.

निवडणुकीत पक्षीय राजकारणाचा विषय नाही – कल्याणशेट्टी

दरम्यान, भाजप-काँग्रेस युतीबाबत बोलताना, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले. दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत. त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे, पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य – दिलीप माने

काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांनीही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या होत्या. त्यांनी आम्हाला आवाहन केले, ते आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केला, असे दिलीप माने म्हणाले. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभू आहे, असेही दिलीप माने यांनी स्पष्ट केले आहे.

27 एप्रिलला मतदान, 28 ला मतमोजणी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18 संचालक निवडण्यात येणार आहेत. त्यात विविध विकास कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांमधून 11, तर ग्रामपंचायतींच्या सदस्यांमधून 4, व्यापारी मतदारासंघातून 2 आणि हमाल-तोलार मतदारसंघातून 1, अशा पद्धतीने 18 संचालकांची निवड केली जाणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. मागील निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी आमदार दिलीप माने, आमदार विजयकुमार देशमुख आणि बळीराम साठे यांचा पॅनेल होते. त्यात सर्वपक्षीय असलेल्या माने-देशमुख-साठे पॅनेलचा विजय झाला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »