‘आदिनाथ’साठी आज मतदान; चुरशीची लढत होणार
करमाळा- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) आदिनाथ साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी गुरुवारी (दि. 17) मतदान होणार आहे. 72 मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. मतदान केंद्रावर सहा अधिकारी-कर्मचारी अशा एकूण 432 कर्मचार्यांची नेमणूक केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.
आदिनाथ कारखान्याच्या एकूण सभासद संख्येमध्ये करमाळा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे. आदिनाथ कारखान्यासाठी ऊस उत्पादक गटामधून 28 हजार 228 मतदार आहेत. संस्था मतदारसंघातून 350 मतदार आहेत. असे सर्व मिळून 29 हजार 49 मतदार या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी आठ ते पाच या वेळेत मतदान होईल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील हसनापूर येथे फक्त पाच मतदार आहेत. हळगाव, पिंपरखेड, नान्नज या ठिकाणी प्रत्येकी एक केंद्र असून जवळा येथे दोन मतदान केंद्र आहेत. 12 गावांमधून पाच ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. 72 केंद्रांवर होणार्या निवडणुकीसाठी 11 विभागीय फिरती पथके नेमली आहेत.
चोख पोलिस बंदोबस्त
या निवडणुकीसाठी एकूण 131 पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये पाच पोलिस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व 131 पोलिस असा लवजमा ठेवला आहे.