कोयत्याचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कारमध्ये झोपलेल्या दोघांचे सहा लाखाचे दागिने लुटले
मोडनिंब- (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) रात्रीच्या प्रवासात झोप लागल्याने कार महामार्गाच्या बाजूला लावून झोपलेला मुलगा व त्याच्या आईला तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून व डोळ्यात चटणी टाकून सुमारे सहा लाख रूपये किंमतीचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व साडेतीन हजार रूपये रोख असा एकूण सहा लाख तीन हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.
ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर भुईंजे हद्दीतील यशराज हॉटेल समोर शनिवारी मध्यरात्री २.५० वा.च्या सुमारास घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खळबळजनक घटनेची पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, विशाल रामचंद्र सुर्यवंशी (वय ४२) रा.उमरगा जि.धाराशिव यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये विशाल सुर्यवंशी व त्यांची आई शकुंतला सुर्यवंशी हे दोघे एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गेले होते.
तेथून रात्री कारने (एमएच-२५/आर ३१२०) उमरगा येथे परत निघाले होते. पहाटे २.४० मि.ते २.५५ मि.या दरम्यान पुणे – सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीच्या पुढे दहा किलोमीटर अंतर गेल्यावर विशाल सुर्यवंशी यांना झोप येत असल्याने ते कार भुईंजे गावच्या हद्दीतील यशवंत हॉटेल समोर महामार्गाच्या बाजूस उभी करून झोपले होते. त्यावेळी २२ ते २५ वयोगटातील तरूण चोरटे तेथे अचानक आले. त्यांनी विशाल सुर्यवंशी यांच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून व डोळ्यात चटणी टाकून एकाने फिर्यादीकडील साडेतीन हजार रूपये काढून घेतले.
त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी विशाल सुर्यवंशी यांची आई शकुंतला सुर्यवंशी यांच्या बाजूस जाऊन त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. या चोरट्यांनी त्यांच्याकडील सहा तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या (बांगड्या ), तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या,अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या,एक तोळे वजनाचे कानातील सोन्याचे झुबे फुले व एक तोळे वजनाची सोन्याची गळ्यातील चेन असा एकूण बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन चोरून नेले.
या चोरट्यांनी विशाल सुर्यवंशी यांना पोलासांकडे गेल्यास याद राख अशी दमदाटी केली. घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन विशाल सुर्यवंशी यांनी ११२ वर कॉल करून घटनेची माहिती पोलीसांना दिली. यानंतर टेंभुर्णी पोलीस तातडीने घटनास्थळी आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत.