डॉ. वळसंगकर आत्महत्या, आरोपीच्या वकिलाचा मोठा दावा; ‘वस्तुस्थिती वेगळी, सुसाईड नोट प्लॅन्ट केलीय, सोमवारी जामीनासाठी अर्ज करणार’


सोलापूर –(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला दहा दिवस उलटूनही केवळ वळसंगकर रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या अटकेच्या पुढे या प्रकरणाचा तपास जाऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे मुसळे मानेकडून ठोस माहिती काढण्यात पाेलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. त्यातून शुक्रवारी खुद्द पोलिसांनीच मनीषाला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमागची वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या खिशातील सुसाईड नोट कोणीतरी प्लॅन्ट केलेली आहे. आता संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिच्या जामिनीसाठी उद्या सोमवारी आम्ही न्यायालयात अर्ज करणार आहोत, असे तिचे वकिल प्रशांत नवगिरे यांनी सांगितले.

दरम्यान, मनीषा मुसळे माने हिच्याबद्दल 2024 मध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी कानावर आल्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर यांनी तिच्याकडील अधिकार काढून घेतले होते, त्यामुळे मुसळे माने ही इतर सहकाऱ्यांशी उद्धटपणे वागत होती. त्यातूनच इतर कर्मचाऱ्यांनी डॉ. वळसंगकर आणि हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

मनीषा मुसळे माने हिला डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मागील शनिवारी (ता. 19 एप्रिल) रात्री अटक करण्यात आली होती. रविवारी तिला न्यायालयापुढे उभे करण्यात आले होते. त्या वेळी सुरुवातीला तीन दिवस, त्यानंतर दोन दिवस असे पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत मनीषा मुसळे माने हिच्याकडे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे पोलिसांपुढे न्यायालयीन कोठडी मागण्याशिवाय पर्याय नव्हता, हे उघड आहे.

Advertisement

दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी अजित लकडे हे दोन दिवसांच्या सुटीवर गेले आहेत, त्यामुळे ह्या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा फौजदार संजीवनी व्हट्टे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एवढ्या महत्वाचा प्रकरणाचा तपास सुरू असताना मुख्य अधिकारी सुटीवर कसे जातात, असा सवाल उपस्थित होत आहे.

मनीषा मुसळे माने हिला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळूनही पोलिसांच्या हाती काहीही ठोस पुरावे लागलेले नाहीत. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमागची वस्तुस्थिती वेगळी आहे. डॉ. वळसंगकर यांच्या खिशातील सुसाईड नोट कोणीतरी प्लॅन्ट केलेली आहे, असा आमचा दावा आहे, त्यामुळेच येत्या सेामवारी आम्ही मनीषा मुसळे माने हिच्या जामीनासाठी अर्ज करणार आहोत, अशी माहिती संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगिरे यांनी सांगितले.

पोलिसांनी पाच दिवसांत डॉ. शिरीष वळसंगकर, तसेच संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे हस्ताक्षर व स्वाक्षरीची कागदपत्रे जप्त केली आहेत. मुसळे माने हिने डॉ. शिरीष, डॉ. उमा आणि डॉ. अश्विन यांना केलेल्या ई-मेलची प्रतही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मनीषाच्या घराची झाडाझडती घेऊनही कोणतीही संशयास्पद ऐचज पोलिसांना आढळून आलेला नाही. वळसंगकर हॉस्पिटलमधील 27 कर्मचाऱ्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. माफीनाम्याची चिठ्ठी पोलिसांना मिळालेली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »