बार्शी बसस्थानकात नवविवाहितेचे पाच लाखांचे दागिने लंपास


बार्शी–(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) बार्शी शहरातील बसस्थानकावर धाराशिव बसमध्ये सामान ठेवायच्या रॅकमध्ये ठेवलेली बॅग आजी-आजोबांना बसच्या दरवाज्यातून हाताने आधार देईपर्यंत चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये नवविवाहितेचे पाच लाख रुपयांचे दागिने होते. बार्शी शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा झाला आहे.

नवविवाहिता श्रद्धा सरक (वय २०, रा. आश्रम रोड, उरळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना २६ एप्रिल रोजी दुपारी सव्वातीन वाजता घडली. दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या श्रद्धा सरक माहेरी धाराशिव येथे बहिणीच्या विवाहासाठी येत होत्या. उरळी कांचन येथून दुपारी साडेअकरा वाजता पुणे-लातूर बसने येऊन बार्शी बसस्थानकावर आजी सिंधू देवकते, आजोबा बाबूराव देवकते यांच्यासह दुपारी तीन वाजता उतरल्या. सव्वातीन वाजता बार्शी-धाराशिव बस फलाटावर आली. त्यावेळी खूप गर्दी होती. मी प्रथम बसमध्ये जाऊन जागा पकडली व सामान ठेवायच्या रॅकमध्ये बॅग ठेवली आणि आजी-आजोबांना बसच्या दरवाज्याजवळ येऊन त्यांना बसमध्ये घेतले. परत रॅकमध्ये बॅग पाहिली असता बॅग दिसली नाही. इतर प्रवासी तसेच वाहकास विचारता गर्दीमुळे लक्ष नव्हते, असे उत्तर मिळाले. बॅगमध्ये साडेतीन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे मिनी गंठण, सात ग्रॅमचे झुमके, जोडवे असे दागिने होते. बहिणीच्या विवाहामुळे दागिने घेऊन आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार डबडे तपास करीत आहेत.

Advertisement

बार्शी बसस्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी संख्या असते. परंतु बंदोबस्तासाठी एकही पोलिस नसतो. आतापर्यंत अनेक बॅगा चोरीस गेल्या आहेत. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. दिवस-रात्र बस वाहतूक असतानाही प्रवाशांसाठी सुरक्षा व्यवस्था मात्र दिसत नाही. एसटी महामंडळाने अथवा पोलिस ठाण्याने सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

– अतुल वखारिया, प्रवासी, बार्शी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »