‘उजनी’तून भीमा नदीत १५ हजार क्युसेकने विसर्ग
टेंभुर्णी/प्रतिनिधी: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वरचेवर वाढत असून, धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे, शनिवारी धरणाची पाणीपातळी ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. पाण्याचा वाढता विसर्ग आणि आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ६९ टक्के भरले होते. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग ७२ हजार क्युसेकपर्यंत होता.
सायंकाळी सहानंतर तो विसर्ग ६६ हजारांपर्यंत झाला होता. शनिवारी (ता.२१) हा विसर्ग कमी करत ३७ हजार ९९० क्युसेकपर्यंत खाली आणण्यात आला. तरी वरच्या बाजूकडून येणाऱ्या या पाण्याच्या अखंड विसर्गामुळे धरणातील पाणीपातळी मात्र झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास उजनी धरणाची पातळी ७३.५८ टक्क्यांवर पोहोचली.
दुपारनंतर ती ७५ टक्क्यांचा टप्पा ओलांडून ८० टक्क्यांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. पण पाण्याच्या वाढत्या विसर्गामुळे आगामी आषाढी वारी दरम्यान संभाव्य पूरस्थिती टळावी, यासाठी पुढे पंढरपुरात पाणी पातळी नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याचाच भाग म्हणून धरणातून भीमा नदीत १५ हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. वरून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा अंदाज घेऊन त्यात आणखी घट किंवा वाढ होईल, असे सांगण्यात आले. मुख्यतः आषाढी वारीच्या काळात नदीपात्रात काठोकाठ पाणी राहणार नाही, यादृष्टीने आतापासूनच नियोजन केले जात आहे.
आपत्ती यंत्रणा सज्ज
आषाढी वारीच्या काळात चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी होते, वारीच्या काळात १२ ते १५ लाख भाविक पंढरीत असतील, असा अंदाज आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने आत्तापासूनच नियोजन सुरू केले आहे.
वारीच्या काळात ८ दिवस पंढरपूरमध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथील प्रशिक्षित स्वयंसेवक आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) किंवा ‘एनडीआरएफ’चे पथक असणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील नऊ आणि अन्य जिल्ह्यांतील आठ मोटार बोटी पंढरपुरात दाखल होतील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी दिली.
मुख्य कालव्यातून ५०० क्युसेकने पाणी सोडले
उजनी धरणात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पाण्याची एकूण पाणीपातळी ४९५.५७० मीटरपर्यंत राहिली. तर एकूण पाणीसाठा ११३.८ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ३९.४२ टीएमसी एवढा राहिला. तर पाण्याची टक्केवारी ७३.५८ टक्के एवढा राहिली. त्याशिवाय धरणातून मुख्य कालव्यातून ५०० क्युसेक, सांडव्यातून ११ हजार आणि वीजनिर्मितीला १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

