कार्तिकीच्या विठ्ठलपूजेचा तिढा सुटला…; सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य
सोलापूर: पंढरपूरमध्ये मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार आहे. तसेच फडणवीस अर्धा तास आंदोलकांना देखील भेटणार आहेत. मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
मराठा समाजाच्या पाच मागण्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मान्य झाल्या आहेत. दरवर्षी आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पण यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. कारण राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला होता.